नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न; बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण झाला असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांच्या मुंबईतील सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसरात बंदोबस्त वाढवला असून संशयास्पद बॅगची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे. सध्या बॅगेत नेमके काय आहे, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, कोणताही धोका टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
ही बॅग नेमकी कुणाची आहे, ती तिथे कशा उद्देशाने ठेवण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासानंतरच ही निष्काळजीपणा की घातपाताचा प्रयत्न, हे स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून मंत्री नितेश राणे हे हिंदुत्ववादी भूमिका आक्रमक पद्धतीने मांडताना पाहायला मिळत आहे. नितेश राणेंची सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच अशा प्रकारची बेवारस बॅग त्यांच्या घरामुळे घराबाहेर सापडल्याने संशय व्यक्त केला जात आहे. हा घातपाताचा प्रकार आहे का? याबाबत पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. आता पोलिसांच्या तपासणीत नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.