अंबरनाथमध्ये काँग्रेस ॲक्शन मोडवर! भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांचे पद रद्द होणार
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – अंबरनाथमधील राजकीय घडामोडींनी आता एक वेगळे वळण घेतले आहे. काँग्रेस पक्ष आपल्या बंडखोर नगरसेवकांविरोधात आक्रमक झाला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १२ नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी काँग्रेसने आता कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणासाठी पक्षाने विशेष कायदेतज्ज्ञांची टीम तैनात केली असून, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे अंबरनाथसह संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेसने यापूर्वीच आपल्या या नगरसेवकांना निलंबित केले होते, मात्र त्यांनी २४ तासांच्या आत भाजपाचे कमळ हाती घेतल्याने काँग्रेसने आता आरपारची लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत.
अंबरनाथमधील १२ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे नगरसेवकपद तांत्रिकदृष्ट्या धोक्यात आणण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी कायद्यातील विविध तरतुदींचा अभ्यास केला जात आहे. काँग्रेस पक्ष या कामासाठी निष्णात वकिलांची फौज मैदानात उतरवणार असून, या बंडखोर नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग अवलंबले जाणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणात कोणत्याही स्तरावर तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेचे राजकीय समीकरण अतिशय रंजक वळणावर आहे. येथील एकूण ५७ जागांपैकी शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले होते, जे संख्येने सर्वाधिक आहेत. याशिवाय भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादीचे ४ आणि १ अपक्ष असे बलाबल आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना केली होती.३१ नगरसेवकांच्या जोरावर हे ऑपरेशन लोटस यशस्वी केले.
सत्तेसाठी भाजपने काँग्रेसची साथ घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेस पक्षाने शिस्तीचा बडगा उगारत त्यांच्या १२ नगरसेवकांना निलंबित करण्याची घाई केली. काँग्रेसच्या या निर्णयाचा फायदा घेत भाजपने या सर्व निलंबित नगरसेवकांना थेट आपल्या पक्षात प्रवेश दिला. यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसचे अस्तित्व सध्या तरी संपुष्टात आले असून शहर पूर्णपणे काँग्रेसमुक्त झाले आहे. मात्र, आता हा वाद रस्त्यावरून न्यायालयात जाणार असल्याने नगरसेवकांचे पद टिकणार की जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.