मराठी माणसाच्या हितासाठी मुंबईत ठाकरेच हवेत : राजू शेट्टी
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणूस विरुद्ध हिंदी भाषिक अशा ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर जात असताना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केला आहे. “मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत. आमची त्यांना सहानुभूती आहे,” असे स्पष्ट मत शेट्टी यांनी व्यक्त केले.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी धाराशिव येथे झालेल्या आंदोलनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली. “महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले, याची माहिती घेतली तर मराठीवरील मुख्यमंत्र्यांचे प्रेम किती आहे, हे लक्षात येईल,” असा टोला शेट्टी यांनी लगावला.
राज्यातील इतर महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पाठिंबा देणारे राजू शेट्टी यांनी मात्र मुंबईसाठी वेगळी भूमिका घेतली आहे. “आमचे ठाकरे बंधूंशी वैचारिक मतभेद असले तरी मुंबईत मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवर आणि मराठी माणसावर आपले प्रेम असून त्यांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शेट्टी यांनी पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला.