मोबाईल व पैशाच्या संशयातून मित्रांनीच मित्राचा खून; जटवाडा डोंगरावर नेऊन गळा चिरला

Spread the love

मोबाईल व पैशाच्या संशयातून मित्रांनीच मित्राचा खून; जटवाडा डोंगरावर नेऊन गळा चिरला

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : मोबाईल व पैसे चोरल्याच्या संशयातून मित्रांनीच मित्राचा अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरावर तरुणाला नेऊन त्याला सिगारेटचे चटके देण्यात आले, डोळ्यांवर पट्टी बांधून बेदम मारहाण करण्यात आली आणि अखेर निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली. मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली.

शकील आरेफ शेख (३०, रा. फुलेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास करून मुख्य आरोपी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज याला अटक केली आहे. त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर व अन्य एक अशा पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. तो अनेकदा घराबाहेर राहत असल्याने गेल्या तीन दिवसांपासून घरी न गेल्याची फारशी दखल कुटुंबीयांनी घेतली नव्हती. मात्र मंगळवारी सकाळी जटवाडा परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना डोंगरावर एका तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला.

या हत्येचा कट आरोपींनी आठवडाभरापूर्वीच रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ४ जानेवारी रोजी शकील घराबाहेर पडल्यापासून आरोपी त्याच्या मागावर होते. पार्टीचे आमिष दाखवून त्याला जटवाडा डोंगरावर नेण्यात आले. दारूच्या नशेत पुन्हा पैशावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी शकीलला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांवर पट्टी बांधून मारहाण केली आणि अखेर गळा चिरून घटनास्थळावरून पसार झाले.

हत्या झालेली जागा दौलताबाद व छावणी पोलिस ठाण्यांच्या हद्दीच्या सीमेवर असल्याने सुरुवातीला अधिकारक्षेत्रावरून संभ्रम निर्माण झाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सायंकाळी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मृत शकीलचा भाऊ सलमान शेख याने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी सिराजने त्यांच्या आईच्या मोबाईलवर फोन करून “शकीलने मोबाईल व पैसे घेऊन पलायन केले आहेत. तो कुठे आहे ते सांगा, अन्यथा त्याचा खून करू,” अशी धमकी दिली होती. या धाग्यावरूनच पोलिसांनी तपास करत संशयितांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon