कोळसेवाडी पोलिसांनी बेकायदेशीर पिस्टलसह तरुणाच्या मुसक्या आवळल्या
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नेतीवली परिसरात अवैधरित्या पिस्टल बाळगून फिरणाऱ्या तरुणाला कोळसेवाडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. करण जितु निशाद (वय २१, रा. देसलेपाडा, डोंबिवली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेतीवली परिसरात एक इसम पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, ६ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गुन्हे शोध पथकाने जुने धान्य गोदामाजवळ सापळा रचला. त्यावेळी संशयित करण निशाद याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचे स्टीलचे पिस्टल जप्त करण्यात आले. सदर पिस्टल १७ सेंटीमीटर लांबीचे असून त्याला मॅगझिन व चॉकलेटी रंगाची ग्रिप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव व पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.