पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई, कामोठे चेकनाक्यावर १७ लाखांची रोख रक्कम जप्त

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी आचारसंहिता लागू होताच निवडणूक यंत्रणेने सतर्कता वाढवली असून, त्याचा परिणाम म्हणून मोठी कारवाई उघडकीस आली आहे. सायन–पनवेल महामार्गावरील कामोठे चेकनाक्यावर वाहन तपासणीदरम्यान एका कारमधून तब्बल १७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
नियमित तपासणीदरम्यान पांढऱ्या रंगाच्या ग्रँड विटारा कारची झडती घेतली असता, कापडी पिशवीत लपवून ठेवलेली संशयास्पद रोख रक्कम आढळून आली. ही कारवाई स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) क्रमांक ३ यांनी केली. जप्त करण्यात आलेली रक्कम तात्काळ ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आयकर विभागाला कळविण्यात आले असून, आयकर विभागाकडून आवश्यक प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पनवेल महानगरपालिका निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ चे निवडणूक निर्णय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी याप्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
या कारवाईवेळी आचारसंहिता पथक प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेधमाळे, समन्वय अधिकारी तथा उपायुक्त रविकिरण घोडके, अधिक्षक मनोज चव्हाण, पथक प्रमुख सुदिन धनाजी पाटील (ग्रामविकास अधिकारी), पथक सदस्य नरेंद्र गावंड व प्रशांत फडके, तसेच कामोठे पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई जितेश नवघरे आणि अक्षय सूर्यवंशी उपस्थित होते.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने स्थिर सर्वेक्षण पथके, भरारी पथके आणि व्हिडिओ निरीक्षण पथकांना अधिक सजग राहण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता अधिक बळकट झाली असून, मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.