शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनी मारहाण; ८ ते १० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे, अशातच प्रचार, बैठका, चर्चा यांना वेग आला आहे, या दरम्यान घरात प्रचार करण्याला विरोध केल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्त्यांकडून दोन व्यक्तींना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लाथा-बुक्क्यांसह पक्षाच्या झेंड्यांनीही मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या ८ ते १० कार्यकर्त्यांच्या विरोधात मध्यरात्री एम.एच.बी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर पश्चिम परिसरात काल प्रचार फेरी दरम्यान शिंदे गटाचे ८ ते १० कार्यकर्त्यांच्या टोळीकडून दोन व्यक्तींना बेदम मारहाण करण्यात आली आहे. दहिसर विठ्ठलवाडी सोसायटीजवळ शिंदे गटाचे प्रचार सुरू असताना कार्यकर्ते एका घरात प्रचार करण्यासाठी गेले असता त्या घरात विरोध करण्यात आला त्यानंतर ही घटना घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिंदेसेनेचे कार्यकर्ते एका घरात प्रचार करण्यासाठी गेले असता त्या घरात विरोध करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रचार करणारे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्या घरात दोन व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी रात्री शिवसेना शिंदे गटाचे आठ ते दहा कार्यकर्त्यांविरोधक गुन्हा दाखल करून धरपकड सुरू केली आहे. मात्र ऐन निवडणुकीचा प्रचारामध्ये कार्यकर्त्यांच्या गुंडागिरीमुळे परिसरात मोठा राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र निवडून येण्यापूर्वी जर कार्यकर्त्यांची अशी दादागिरी असेल तर मात्र भविष्यात काय होणार अशा प्रश्न दहिसर मध्ये स्थानिक नागरिक विचारत आहेत.