लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर

Spread the love

लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर

योगेश पांडे / वार्ताहर

लातूर – लातूरजवळील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनी अनुष्का किरण पाटोळे हिचा वसतिगृहात मृत्यू झाल्याच्या घटनेने वातावरण चांगलेच तापले आहे.रविवारी अनुष्काचा मृतदेह पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अत्यंत हुशार आणि चुणचुणीत विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांसह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. अभ्यासाचा ताण कारणीभूत असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला, तरी नातेवाईकांनी मात्र हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ अनुष्काच्या नातेवाईकांनी, विशेषतः महिलांनी, लातूर शहरातील गांधी चौकात अचानक रास्ता रोको केला. “दोषींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शासन करू,” अशी संतप्त मागणी करत महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. हातात साड्या धरून दोरी तयार करत त्यांनी रस्ता अडवल्याने गांधी चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली व दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणले.मात्र तपास सुरू असतानाच नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याने गांधी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

लातूर शहरालगत असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पालक जमा झाले. काही पालकांनी विद्यालयात विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे आरोप करत तक्रारी केल्या आहेत. अशा वातावरणामुळे विद्यार्थी मानसिक तणावात राहत असल्याचा दावा पालकांकडून केला जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon