मनसेच्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील चार आरोपींना सापळा रचून टोलनाक्यावर अटक
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापूर – सोलापूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मनसे विद्यार्थीसेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर सापळा रचत चार आरोपींना अटक केली. पकडण्यात आलेल्या चारही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी सोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काही दिवसांआधी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या वादातून मनसे विद्यार्थीसेनेचा शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदेंचा खून झाला होता. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली. या खून प्रकरणातील शंकर शिंदे, सुनील शिंदे, आलोक शिंदे आणि महेश भोसले,हे चार संशयित फरार झाले होते.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अमित ठाकरे घरी पोहोल्यानंर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. तुमचं राजकारण काहीही असो, तुमचे बिनविरोध निवडून येवो पण राजकारणासाठी कोणाचा जीवा जाता कामा नये. मी यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले. तर, सरवदे कुटुंबीयांना भेट देत त्यांनी सांत्वन केलं. यावेळी, ‘माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही’, असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी अमित ठाकरेंसमोर फोडला. सोलापुरात राजकीय वादातून हत्या झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांनी आणि कुटुंबीयांनी अमित ठाकरे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. त्यावेळी, अमित ठाकरेंनाही गहिवरुन आलं होतं.
दरम्यान, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी मयत बाळासाहेब सरवदे याच्या डोळ्यात चटणी टाकून इतर आरोपीनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलंय. मयत बाळासाहेब याचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याच्या फिर्यादीवरून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस कलम 103, 109, 189 (1),(2), 190, 191(2),(3), 49, 352, 351(2), शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.