श्रीरामपूर शहरात काँग्रेसच्या बंटी जहागीरदारांवर भरदिवसा गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू, शहरात खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – श्रीरामपूर शहरात बुधवारी भर दुपारी झालेल्या थरारक गोळीबाराने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून घरी परतणाऱ्या असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास बंटी जहागीरदार हे मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ आधीपासून दबा धरून उभ्या असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने अचानक त्यांच्या दिशेने दगड फेकला. दगड लागल्याने बंटी खाली उतरले आणि त्यांनी तो दगड परत फेकताच क्षणार्धात हल्लेखोरांनी पिस्तुल काढून गोळीबार सुरू केला.
हल्लेखोरांनी जवळून गोळीबार करत बंटी जहागीरदार यांच्या पोटात, पायाला तसेच पाठीवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या बंटी यांना मागून येणाऱ्या नागरिकांनी तातडीने कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉ. जगधने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत प्राथमिक उपचार केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कार्डियाक व्हॅनद्वारे नगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बंटी जहागीरदार यांनी अखेरची श्वास घेतला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच श्रीरामपूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कामगार हॉस्पिटल, सय्यद बाबा चौक आणि मौलाना आझाद चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मृत्यूनंतर त्यांना आता संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन पाठवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. बंटी जागीरदार यांचे हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.