खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना बुधवारी अज्ञात व्यक्तीने बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी आज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
खासदार संजय राऊत कुटुंबियांसह भांडुप परिसरात वास्तवास आहेत. संजय राऊत घराबाहेर उभ्या असलेल्या एका मोटारगाडीवर आज्ञात व्यक्तीने बुधवारी त्यांना ठार मारण्याचा संदेश लिहीला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घराबाहेर एक मोटारगाडी उभी असून त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. या धुळीवरच संजय राऊत यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी लिहिण्यात आली होती. बुधवारीची रात्र संजय राऊत यांची शेवटची रात्र असेल, असे संदेशात नमूद करण्यात आले होते.
एका कार्यकर्त्याने बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास हा संदेश वाचल्यानंतर त्याने तत्काळ याबाबत कांजूरमार्ग पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथक दाखल झाले. या पथकांनी परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र अद्याप कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.