ठाण्यात मोबाईल चोरांचा बंदोबस्त ! बसस्टॉपवरील टोळी जाळ्यात; १५ मोबाईल हस्तगत, आठ गुन्ह्यांची उकल
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे : बसस्टॉप व गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या खिशावर डोळा ठेवत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर नौपाडा पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल १५ स्मार्टफोन (किंमत अंदाजे १.४५ लाख रुपये) जप्त करण्यात आले असून गुन्ह्याच्या तपासात एकूण आठ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
फिर्यादी अरविंद शंकर आंब्रे यांनी दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी तीन हात नाका परिसरात प्रवासादरम्यान रेडमी कंपनीचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणी गु.र.नं. ७५५/२०२५ भा.न्या.सं. ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने तपासाची चक्रे वेगात फिरू लागली.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास पुढे नेताना पोलिसांना संशयास्पद इसम बसमध्ये चढण्याचा बहाणा करत पुन्हा खाली उतरत असल्याचे दिसून आले. त्यांची ओळख मिळविल्यानंतर सदर इसम मोबाईल चोरीत सक्रिय असल्याची माहिती उघडकीस आली. त्याचदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नौपाडा एलबीएस मार्गावर सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पळून जाण्याचा प्रयत्न करताना पाठलाग करून करण्यात आलेल्या या अटक कारवाईत सागीर अहमद मोहमंद शब्बीर सिद्दीकी (३५, रा. शिवाजीनगर, गोवंडी) व इजहार अबरार बेग (३८, रा. दर्गा चाळ, सायन) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींस न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासात आरोपींनी ठाणे परिसरात विविध गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून नौपाडा पोलीस ठाण्यातील २०२४ व २०२५ मधील एकूण आठ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. विशेष म्हणजे आरोपी इजहार बेग याच्या नावावर बोरीवली, बांद्रा रेल्वे, पार्कसाइट, एमआयडीसी अंधेरी, वाशी यांसारख्या ठाणेबाहेरील पोलीस ठाण्यातही दहा पेक्षा अधिक गुन्हे नोंदलेले आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ–१ सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त संभाजी जाधव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोनि मंगेश भांगे, पोनि संजय दवणे, पोनि लक्ष्मण राठोड तसेच पोहवा व पोशि पथकातील अन्य अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. ठाण्यात वाढत्या मोबाईल चोरीवर ही कारवाई प्रभावी ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.