रिकीज बार ॲन्ड किचनचा कायद्याला चॅलेंज देत जलवा! सार्वजनिक फुटपाथचा कब्जा
पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग निद्रावस्थेत, बारच्या मालकाकडून पदपथावर उघड मद्यपानाचा धिंगाणा?
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : हिरानंदानी इस्टेट परिसरातील रिकीज बार ॲन्ड किचन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. कायद्याच्या कचाट्यात यावे यासाठी नागरिक, समाजसेवक आणि पत्रकारांकडून दाखल झालेल्या तक्रारींचा अमाप ढिगारा असतानाही हे रेस्टॉरंट प्रशासनाच्या उघड आशिर्वादाने धडाक्यात सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी या बारमध्ये पोलिस व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी विशेष पार्टीचे आयोजन केल्याची जोरदार चर्चाही रंगली आहे. पदपथावर टेबल-खुर्च्या मांडून उघड्यावरच मद्यसेवनाची व्यवस्था केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अनुशासनाचा सार्वजनिक भंग होत असल्याचे चित्र दिसत असले तरी त्यावर कारवाई करण्याचे धाडस कुणी करीत नसल्याचे दिसून येत आहे.
🔴 पोकळ, डरफोक यंत्रणा तर कायद्याची ऐशी की तैशी
उच्चभ्रू वस्तीत असा धिंगाणा सुरू असून, तरुण पिढीत मद्य संस्कृतीला चालना दिली जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. मोठ्या आवाजातील डीजे, रात्री उशीरपर्यंत सुरू असलेले नृत्य, फुटपाथचा कब्जा, बार परवान्यावर वाईन शॉपसारखी विक्री, तसेच अल्पवयीन मुलांना मद्य पुरवठा केल्याचेही गंभीर दावे समोर येत आहेत. या सर्व घटना पाहता प्रशासकीय यंत्रणा पोकळ व डरफोक असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
अनेक वेळा तक्रारी दाखल होऊनही कारवाई न करण्यामागे प्रशासनाचा नापासपणा की कुणाचा दबाव? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे डोळे मिटून मौन आशिर्वाद असल्यानेच या अवैध प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचेही बोलले जात आहे.
🔴 प्रशासन झोपेत की मुद्दाम गप्प?
नियम मोडत असेल तर कारवाई कुठे थांबली? ठाणेकरांकडून आता संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.