चेंबूर येथील प्रभाग १५० मधून आरपीआय (आंबेडकर) तर्फे कु. आयशा अंसारी मैदानात
रवि निषाद / मुंबई
मुंबई : येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत चेंबूर प्रभाग क्रमांक १५० मधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तर्फे कु. आयशा जोहर अली अंसारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रभागातून मुस्लिम समाजातील तरुण महिला उमेदवार म्हणून त्यांची नोंद होणार असून स्थानिक राजकीय वातावरणाला यामुळे चालना मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रभागातील पी. एल. लोखंडे मार्ग परिसरात निवडणुकीची चर्चेला वेग आला असून अंसारी यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेससह इतर पक्षांच्या संभाव्य उमेदवारांसमोर नवा समीकरण निर्माण झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरु आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकालजे यांच्या पाठिंब्यामुळे अंसारी यांना उमेदवारी मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
या प्रभागात मुस्लिम आणि आंबेडकरी मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने पक्षांनी या समाजांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रिपाई (A) कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अंसारी यांच्या प्रचाराला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असून काही भागांमध्ये कार्यकर्त्यांनी तयारीला वेग दिला आहे. नागवाडी, कादरिया नगर, माळेकर वाडी, गुलशन बाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नुरानी बाग, पंजाबी चाल, फुले नगर यांसह इतर परिसरात पक्ष सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.