अवघ्या दोन महिन्यांत ६३७ मोबाईल शोधून परत; परिमंडळ–४ मुंबई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : परिमंडळ–४ मुंबई पोलिसांनी अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ६३७ चोरीचे व हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या हाती सुपूर्त करत नागरिकांचा विश्वास पुन्हा अधोरेखित केला आहे. सुमारे ₹१.१० कोटी किंमतीचे हे मोबाईल शोधण्यात आले असून हा उपक्रम पोलिसांच्या तांत्रिक तपास कौशल्याचा उत्तम नमुना ठरला आहे.
पोलीस आयुक्त परिमंडळ–४ यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली २७ ऑक्टोबर २०२५ पासून विशेष मोहिमेला प्रारंभ झाला. ३० डिसेंबर २०२५ पर्यंत मुंबई, महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या पोलिसांच्या सहकार्याने चोरलेले व हरवलेले मोबाईल शोधण्याचे काटेकोर काम करण्यात आले. या कालावधीत ६३७ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून आयोजित कार्यक्रमात तक्रारदारांना कायदेशीर पद्धतीने हे मोबाईल परत करण्यात आले.
यावर्षी परिमंडळ–४ अंतर्गत एकूण १,७६९ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मोहिमेमुळे चोरी–गहाळ मोबाईल परत मिळण्याचे प्रमाण वाढून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोबाईल परत वितरण कार्यक्रमास पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त रागसुधा आर. यांच्या उपस्थितीत पार पडला.
या मोहिमेत भोईवाडा, काळाचौकी, माटुंगा, आर. ए. किडवाई मार्ग, सायन, एल. टी. मार्ग, वडाळा टी. टी. अशा परिमंडळ–४ मधील पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. सहायक पोलीस आयुक्तांसह ०९ अधिकारी व १२ अंमलदारांनी विशेष मोहिमेत मोलाचे योगदान दिले.