कामराज नगर ट्रांजिट कॅम्पमध्ये ४२ वर्षीय महिलेची हत्या; पंतनगर पोलिसांचे पाच दिवसांत सुगावा, आरोपी अटक

Spread the love

कामराज नगर ट्रांजिट कॅम्पमध्ये ४२ वर्षीय महिलेची हत्या; पंतनगर पोलिसांचे पाच दिवसांत सुगावा, आरोपी अटक

रवि निषाद / मुंबई

मुंबई : घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर ट्रांजिट कॅम्प परिसरात ४२ वर्षीय महिलेला धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तपासासाठी तब्बल १५ पथकांची नेमणूक करीत केवळ पाच दिवसांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

परिमंडळ–७ चे नवनियुक्त पोलिस उपायुक्त हेमराज शिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पोलिसांना महिला मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्वरित पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोस्टमार्टेम अहवालानंतर मृत महिलेची ओळख अमीनाबी सिद्दीकी (वय ४०) अशी करण्यात आली.

उपायुक्त राजपूत यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती लता सुतार यांच्या देखरेखीखाली तपासासाठी १५ विशेष पथके तयार करण्यात आली. परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत अखेर मोहम्मद इरफान उर्फ चांद फकरे आलम अन्सारी (वय ४२) याला अटक केली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मृत अमीनाबी यांनी आरोपीच्या पत्नींकडून सुमारे ३ लाख रुपये उधार घेतले होते. पैशाच्या वादातून अनेकदा वाद निर्माण होत असल्याने संतापाच्या भरात आरोपीने खून केल्याची प्राथमिक कबुली पोलिसांना दिली असल्याचे समजते.
तपासात पोलीस उपनिरीक्षक विक्रम टाकमोगे (पंतनगर), शरद नाणेकर (ट्रोम्बे), अजय गोल्हार (टिळकनगर) यांसह इतर तपास पथकांनी सक्रिय भूमिका बजावली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपायुक्त राजपूत यांनी आरोपीला शोधून काढण्यात योगदान दिलेल्या पथकाचे कौतुक केले असून या प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon