राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वहीं बनेगा जो हकदार होगा; सोशल मीडियावर पोस्टकरत पुर्वेश सरनाईक यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्यभरात महापालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी शेवटची वेळ होती. विविध पक्षांकडून आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. पण अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याचं देखील बघायला मिळालं. विशेष म्हणजे याच नाराजीतून अनेक इच्छुक उमेदवारांनी ठिय्या मांडत आंदोलन करण्याचा देखील प्रयत्न केल्याचं बघायला मिळालं. या सगळ्या गदारोळात मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे. त्यांनी शिवसैनिक आणि मतदारांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यांनी “राजा का बेटा राजा नहीं बनेगा,राजा वहीं बनेगा जो हकदार होगा”, असं म्हटलं आहे.
“२०१७ साली ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढवण्याची संधी मला मिळाली आणि तुम्ही दिलेल्या प्रचंड बहुमतामुळे ती निवडणूक जिंकलो नाही तर तो माझ्यासाठी आशीर्वाद ठरला. तुमचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा तसेच आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या अथक परिश्रमांमुळेच मला ठाण्यातील सर्वात तरुण नगरसेवकांपैकी एक नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यासाठी मी तुमचा मनापासून ऋणी आहे.”
आज अत्यंत नम्रतेने आणि ठाम भावनेने माझा एक वैयक्तिक निर्णय तुमच्यासमोर मांडत आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील विकासाची घडी पुढे नेण्यासाठी आणि एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एका खऱ्या आणि सच्चा शिवसैनिकाला संधी मिळावी, यासाठी मी यावेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अचानक घेतलेला नसून, सुमारे सहा महिन्यांपूर्वीच तो विचारपूर्वक घेतला होता आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला त्याची माहिती देण्यात आली होती.”