कोस्टल रोडवर मर्सिडीजचा भीषण थरार! सुसाट कार थेट खांबावर धडकली, पाठोपाठ दोन टॅक्सींचाही अपघात

Spread the love

कोस्टल रोडवर मर्सिडीजचा भीषण थरार! सुसाट कार थेट खांबावर धडकली, पाठोपाठ दोन टॅक्सींचाही अपघात

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईची नवी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या कोस्टल रोडवर आज दुपारी अपघाताचा भीषण थरार पाहायला मिळाला. वरळी परिसरात भरधाव वेगातील एका आलिशान मर्सिडीज कारचा भीषण अपघात झाला असून, या घटनेत एकूण तीन गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या विचित्र अपघातामुळे कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात वरळी येथील नमन इमारतीसमोर कोस्टल रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावर घडला. मंगळवारी दुपारच्या सुमारास एक मर्सिडीज कार सुसाट वेगाने जात असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली ही आलिशान कार रस्त्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर जोरात जाऊन आदळली. हा आघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या भागाचे प्रचंड नुकसान झाले.

मर्सिडीजचा अपघात घडताच मागून येणाऱ्या वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. मर्सिडीजने अचानक घेतलेल्या वळणामुळे आणि धडकेमुळे मागून येणाऱ्या दोन टॅक्सींना स्वत:ला सावरता आले नाही आणि त्या एकमेकींवर जोरात आदळल्या. काही क्षणातच कोस्टल रोडवर गाड्यांच्या काचांचा खच पडला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

या अपघातात मर्सिडीजमधील एका महिला प्रवाशाच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच, टॅक्सी चालकालाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon