पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सनातन धर्मसभेला चोरट्यांकडून डल्ला; भाविकांचे लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास
योगेश पांडे / वार्ताहर
मिरा-भाईंदर – मिरा-भाईंदरमध्ये आयोजित प्रसिद्ध प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सनातन धर्मसभेला चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले असून, भाविकांचे लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हजारो भाविकांची सुरक्षा महत्त्वाची होती, त्याच परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिरा-भाईंदरच्या हटकेश भागात २४ ते २८ डिसेंबर दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या भव्य प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, आध्यात्मिक माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला होता. या कार्यक्रमासाठी केवळ शहरच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.
कार्यक्रमाच्या सांगतेनंतर लगतच्या नवीन जीसीसी हॉटेल जवळील बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील चेन आणि इतर दागिन्यांवर डल्ला मारला. शुक्रवारपासून सलग तीन दिवस दागिन्यांच्या चोरीचे सत्र सुरू होते. धक्काबुक्की आणि गोंधळाचा फायदा घेत अज्ञात महिलांच्या टोळीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
काशिगाव पोलिसांच्या माहितीनुसार, अद्याप अनेक भाविकांचे दागिने चोरीला गेल्याचा अंदाज असून तक्रारी येण्याचे सत्र सुरूच आहे. या घटनेमुळे आयोजकांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.