अंबरनाथमध्ये नोकरीच्या नावाखाली ४३ कोटींचा ‘जीएसटी घोटाळा’; तरुणांच्या कागदपत्रांवर बनावट कंपन्या, पोलिसांत गुन्हा

Spread the love

अंबरनाथमध्ये नोकरीच्या नावाखाली ४३ कोटींचा ‘जीएसटी घोटाळा’; तरुणांच्या कागदपत्रांवर बनावट कंपन्या, पोलिसांत गुन्हा

अंबरनाथ : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत पाच बेरोजगार तरुणांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा वापर करून तब्बल ४२ कोटी ९९ लाख ३१ हजार रुपयांची संशयास्पद उलाढाल केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. तरुणांच्या नावावर बनावट कंपन्या स्थापन करून जीएसटी फसवणूक केल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात अंबरनाथ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे.

महात्मा फुले नगर येथील अमर जैसवार हा तरुण गेल्या वर्षी नोकरीच्या शोधात असताना मित्र विशाल यादव यांच्या ओळखीने सलमा सय्यद नावाच्या महिलेशी संपर्कात आला. नोकरी देण्याचे आश्वासन देत सलमाने अमर याच्यासह आदिल सैय्यद, विशाल जैसवार, रजनीश गौतम, दीपक करोतिया आणि रितेश यादव या तरुणांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक व्यवहार संबंधित कागदपत्रे व ओटीपीही मिळवला, अशी फिर्याद आहे.

प्रकरणाचा पर्दाफाश नोव्हेंबर २०२५ मध्ये झाला. वांद्रे येथील जीएसटी विभागाचे अधिकारी अमरच्या घरी चौकशीसाठी अचानक पोहोचले. “तुमच्या नावावर कंपनी असून संशयास्पद व्यवहार झाले आहेत,” असे सांगितल्यानंतर अमरला सर्व प्रकार लक्षात आला. तपासात उघड झाले की सलमा सय्यद हिने अमरच्या नावावर ‘जलज्योती एन्टरप्रायझेस’सह अनेक बनावट कंपन्या उघडल्या होत्या.

या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून ४३ कोटी रुपयांच्या आसपासची परस्पर उलाढाल झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तरुणांच्या नकळत त्यांची ओळख व दस्तऐवज आर्थिक गुन्ह्यांसाठी वापरल्याचे समोर येताच अमर जैसवार याने पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी सलमा सय्यद आणि विशाल यादव यांच्याविरुद्ध फसवणूक आणि संगनमताचे गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon