घाटकोपर पूर्वेत फेरीवाल्यांकडून महिन्याला ७–८ लाखांची लाच?; राजकीय पाठबळ असल्याचा आरोप
रवि निषाद / मुंबई
मुंबई : घाटकोपर पूर्व परिसरात फेरीवाल्यांकडून कथितपणे महिन्याला सात ते आठ लाख रुपये लाच घेतली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. लाच घेणाऱ्यांमध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा काही स्थानिकांनी केला असून फेरीवाल्यांमध्ये याबाबत मोठा संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर पूर्व भागात सुमारे हजाराच्या आसपास फेरीवाले विविध ठिकाणी व्यवसाय करतात. घाटकोपर स्टेशन परिसर, हिंगवाला लेन, ६० फूट रोड, पंतनगर, ओडियन टॉकीजजवळ, महादेव जाधव चौक, सहकार मार्केट, नित्यानंद हॉटेल परिसर, पंतनगर सब्जी मंडी, कामराज नगर, रमाबाई अंबेडकर नगर आणि पोलीस वसाहत परिसरात फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय आहे. या फेरीवाल्यांकडून ‘घाटकोपर हॉकर्स युनियन’च्या नावाखाली काही लोकांकडून महिन्याला १ ते २ हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार लाच घेणाऱ्यांना राजकीय समर्थन असल्याने विरोध करण्यास कोणी धजावत नाही. काही फेरीवाल्यांनी सांगितले की, “पैसे न दिल्यास दुसऱ्या दिवशी धंदा लावू देत नाहीत, म्हणून आम्ही पैसे देतो”. संबंधितांपैकी काहींवर घाटकोपर आणि पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील आरोप जास्त चर्चेत असून प्रशासन आणि पोलिसांनी लाचखोरीच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी फेरीवाल्यांकडून होत आहे.