जैन मंदिर परिसरात राडा; श्वेतांबर पंथीयांकडून मारहाण, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
योगेश पांडे / वार्ताहर
वाशिम – जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातून पुन्हा एकदा गंभीर प्रकार समोर आला आहे. २५ डिसेंबर रोजी जैन धर्मातील दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथांच्या भाविकांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर दिगंबर जैन समाजाचे विजय जैन यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ही तक्रार दिल्याचा राग मनात धरून श्वेतांबर पंथीयांच्या काही लोकांनी २६ डिसेंबर रोजी दुपारी विजय जैन यांना थेट मंदिर परिसरातून जबरदस्तीने उचललं. यानंतर ५ ते ६ जणांनी त्यांना जोरदार मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत विजय जैन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून एका व्यक्तीने मोबाइलमध्येही हा प्रकार चित्रीत केल्याचं समोर आलं आहे. या दिगंबर पंथीयांच्या भाविकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली असून आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आणि शिरपूर पोलिसांच्या भूमिकेविरोधात आज दुपारी २ वाजता दिगंबर पंथीयांच्या वतीने शिरपूर येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. या मोर्चामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.