नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
नांदेड – जवळा मुरार येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. आर्थिक विवंचनेतून दोन्ही सख्ख्या भावांनी अगोदर आई-वडिलांची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर दोघांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. दोन्ही भावांच्या आत्महत्येची ही घटना रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही हृदयद्रावक घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती.
रमेश लखे हे २५ वर्षांपासून आजारी होते. त्यांची पत्नी राधाबाई, मुले बजरंग व उमेश हे पडेल ते काम करून घर चालवत वडिलांच्या उपचाराचा खर्चही भागवत होते. परंतु, कर्जाचा बोजा वाढत होता. आर्थिक स्थितीमुळे कुटुंब वैफल्यग्रस्त झाले होते. परिणामी, दोन्ही भावांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. हत्या व आत्महत्येचे नियोजन अनेक दिवसांपासून सुरू असल्याचेही तपासात पुढे आले.