परिमंडळ–८ पोलिसांकडून ४० लाखांचा मुद्देमाल परत, १७६ वस्तूंचा नागरिकांना प्रत्यक्ष सुपूर्दगी कार्यक्रम संपन्न
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई : परिमंडळ–८ अंतर्गत येणाऱ्या बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ या सात पोलिस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांतून जप्त व शोधून काढलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. या सामूहिक वितरण कार्यक्रमात एकूण ४० लाख रुपये किंमतीच्या १७६ वस्तूंची सुपूर्दगी करण्यात आली.
सोनसाखळी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, मोटार वाहन चोरी आदी गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या दागिन्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक साहित्य, मोबाईल फोन, रोख रक्कम, वाहने अशा विविध मालमत्तेचा समावेश होता. तांत्रिक तपास, CEIR प्रणालीच्या मदतीने शोधण्यात आलेले १६४ गहाळ मोबाईल फोन देखील या यादीत होते.
उपविभागीय पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या उपस्थितीत बीकेसी पोलिस ठाण्यातील पासायदान हॉल येथे (२७ डिसेंबर २०२५) हा कार्यक्रम पार पडला. संबंधित पोलिस अधिकारी व अंमलदारांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचा मुद्देमाल स्वहस्ते परत देण्यात आला.
मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या तत्पर तपासकार्याबद्दल आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीबद्दल उपस्थितांनी मुंबई पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.