अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई बंगळूरमध्ये तीन एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त; ५५.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त

Spread the love

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई
बंगळूरमध्ये तीन एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त; ५५.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : अंमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF) महाराष्ट्राने बंगळूरमध्ये मोठी कारवाई करत तीन एमडी ड्रग्ज कारखान्यांना उध्वस्त केले. या कारवाईत २१.४० किलो एमडी ड्रग्जसह एकूण ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून दोन मुख्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

या कारवाईची सुरुवात २१ डिसेंबर २०२५ रोजी झाली. एएनटीएफच्या कोकण पथकाने नवी मुंबईतील वाशी गाव परिसरात छापा टाकून अब्दुल कादर रशीद शेख या आरोपीकडून १ किलो ४८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज असा तब्बल १ कोटी ४८ लाख ८० हजारांचा माल जप्त केला. वाशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपासात बेळगाव येथील प्रशांत यल्लापा पाटील हा एमडी ड्रग्ज तयार करत असल्याचे समोर आले. पुढील धागेदोरे तपासताना बंगळूर शहरात तीन ठिकाणी बनावट एमडी ड्रग्जचे कारखाने सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बंगळूर येथे धाड टाकत सुरज रमेश यादव व मालखान रामलाल बिश्नोई यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या चौकशीत स्पंदना लेआउट, एनजी गोलाहळी येथील आर.जे. इव्हेंट फॅक्टरी आणि येरपनाहळी–कन्नूर परिसरातील निवासी घरात चालणारे कारखाने उघडकीस आले.

तिन्ही ठिकाणी छाप्यात ४.१० किलो एमडी पावडर, १७ किलो द्रवरूप एमडी, यंत्रसामग्री व कच्चा माल जप्त करण्यात आला. नंतर तिन्ही कारखान्यांचा पूर्णपणे नाश करण्यात आला. प्राथमिक तपासात या ड्रग्जची देशभर सप्लाय चॅनल तयार असल्याचे, तसेच बंगळूरमध्ये ड्रग्ज विक्रीतून आरोपींनी स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही उघड झाले.

ही कारवाई अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत आणि पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण व पुणे कृती गटाने राबवली. दरम्यान, नागरिकांनी अंमली पदार्थांबाबतची कोणतीही गोपनीय माहिती असल्यास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्याच्या 07218000073 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon