इगतपुरीत खंडणी प्रकरण उघड; मुंबईकडे जाणाऱ्या पशुवाहनांना अडवणारे तिघे पोलिसांच्या कस्टडीत

Spread the love

इगतपुरीत खंडणी प्रकरण उघड; मुंबईकडे जाणाऱ्या पशुवाहनांना अडवणारे तिघे पोलिसांच्या कस्टडीत

रवि निषाद / वार्ताहर

इगतपुरी : परराज्यातून शेळ्या-मेंढ्या घेऊन मुंबईतील देवनार पशुवध गृह येथील बकरा मंडीकडे जाणाऱ्या वाहनांना अडवून खंडणी उकळणाऱ्या तिघांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या कारवाईमुळे पशुव्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून शेळ्या-मेंढ्या घेऊन काही ट्रक सोमवारी (२ मार्च) मुंबईकडे रवाना झाले होते. इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत भिवंडी येथील ज्ञानेश्वर धोंडीराम पाटील उर्फ नाना भाई, प्रदीप सूर्यभान उपाध्याय आणि राहुल बाबूलाल पाटील यांनी ही वाहने अडवली. प्रत्येकी एक लाख रुपयांची खंडणी मागून, तडजोडीनंतर दोन वाहनमालकांकडून प्रत्येकी ४० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकाराचे रेकॉर्डिंग वाहनमालक व व्यापाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्याकडे सादर केले. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास करून गुन्हा क्रमांक २९/२०२६ अंतर्गत बीएनएस २०२३ मधील कलम ३०८(२), ३१९, २१२, ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिस सूत्रांनुसार, नाशिक–मुंबई मार्गावरून परराज्यातून जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून हे आरोपी दीर्घकाळापासून खंडणी घेत असल्याची माहिती आहे. आरोपींच्या अटकेनंतर देवनार येथील पशुव्यापाऱ्यांनी इगतपुरी पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत केले.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी डी. बी. मोरे आणि विशेषतः हेड कॉन्स्टेबल अमित भालेराव यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon