नवी मुंबई मागोमाग भिवंडीमध्ये ही दोन दिवसांत ४ अल्पवयीन मुले बेपत्ता; पालकांमध्ये भितीचे वातावरण
योगेश पांडे – वार्ताहर
भिवंडी – नवी मुंबई परिसरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांंचे सत्र सुरु आहे. भिवंडीमध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागांतून चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शांतीनगर, कोनगाव आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. पहिल्या घटनेत ४ डिसेंबर रोजी पाणीपुरी खाण्यासाठी घराबाहेर पडलेली १६ वर्षांची मुलगी अद्याप घरी परतलेली नाही. याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत, २० डिसेंबर रोजी सकाळी नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडलेली १५ वर्षीय मुलगीही बेपत्ता झाली असून, शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोनगाव परिसरातून २३ डिसेंबर रोजी एक १६ वर्षीय मुलगी कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता घरातून निघून गेली. तिच्या अज्ञानाचा फायदा घेत कोणीतरी तिचे अपहरण केल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. तर चौथ्या घटनेत, भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १५ वर्षीय मुलगा २४ डिसेंबर रोजी ट्यूशनला जातो असे सांगून घरातून पडला, तो पुन्हा परतलाच नाही.
या सर्व प्रकरणांत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये अपहरणाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस पथके तपासासाठी रवाना झाली असली तरी, वाढत्या घटनांमुळे शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असून पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.