बाळासाहेबांचे दोन्ही बछडे एकत्र; शिवसेना (ठाकरे)–मनसे युतीची घोषणा
राज–उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत, शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बहुचर्चित युती अखेर बुधवारी जाहीर झाली. वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची औपचारिक घोषणा केली. मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या घोषणेमुळे ठाकरे कुटुंबातील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र दिसले.
या पत्रकार परिषदेपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. कुटुंबीयांसह घेतलेले हे दर्शन युतीला भावनिक अधिष्ठान देणारे ठरले.
युतीची घोषणा करताना राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना–मनसेची युती झाली आहे, हे मी आज जाहीर करतो. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे मी पूर्वी म्हटले होते. त्या वाक्यापासूनच या एकत्र येण्याची सुरुवात झाली.” जागावाटपाबाबत सध्या स्पष्टता देणार नसल्याचे सांगत त्यांनी सूचक भाष्य केले.
“राजकारणात सध्या ‘मुलं पळवणाऱ्या टोळ्या’ फिरत आहेत. उमेदवारी कधी आणि कशी भरायची, याची माहिती योग्य वेळी दिली जाईल,” असे ते म्हणाले. तसेच, “ज्यांचं महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं,” असे आवाहन करत मुंबईचा महापौर मराठीच आणि तो आमचाच होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर जोरदार टीका करत आक्रमक भूमिका घेतली. “भाजपला मुंबईचे लचके तोडायचे आहेत. आम्ही जर आपापसात भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल,” असे ते म्हणाले. “आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी,” असा पुनरुच्चार त्यांनी केला. मुंबई आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मराठी माणसाला उद्देशून, “आता चुकाल तर संपल; मराठीचा वसा टाकू नका,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
या युतीमुळे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी मतदारांमध्ये नवी ऊर्जा संचारेल, असा अंदाज व्यक्त होत असून, मुंबईच्या राजकारणात या घोषणेचे पडसाद दूरवर उमटण्याची शक्यता आहे.