सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; ७ गुन्हे उघड, १४.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : राबोडी परिसरात ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी खेचून पळ काढणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक करत ठाणे व नवी मुंबईतील एकूण सात सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक आरोपींकडून सुमारे १४.७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास राबोडी पोलीस ठाणे हद्दीत स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ६० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने हिसकावून पळविले होते. या घटनेत महिला रस्त्यावर पडून जखमी झाली होती. या गंभीर प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला.
गुन्हे शाखा घटक-१, ठाणे यांनी सलग १२ दिवस तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत मुंब्रा–शिळफाटा परिसरातील वसीम नुरमोहम्मद शेख (३१) आणि यासीन सिराज खामरे (२२) या दोघांना सापळा रचून अटक केली. त्यांना १८ डिसेंबर रोजी राबोडीतील गुन्ह्यात अटक करण्यात आली.
कौशल्यपूर्ण चौकशीत या आरोपींनी ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ११८ ग्रॅम वजनाचे अंदाजे १४.१६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपये किमतीची ‘ज्युपिटर’ मोटार स्कूटर जप्त करण्यात आली.
उघडकीस आलेले गुन्हे राबोडी, कळवा, मुंब्रा, चितळसर पोलीस ठाणे तसेच नवी मुंबईतील बाले पोलीस ठाणे हद्दीतील आहेत. दोन्ही आरोपींवर यापूर्वीही सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड व गुन्हे शाखेच्या पथकाने केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी, पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर यांनी सांगितले.