१५ हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाच्या सहकाऱ्याला रंगेहाथ पकडले

Spread the love

१५ हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाच्या सहकाऱ्याला रंगेहाथ पकडले

पोलीस महानगर नेटवर्क

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारत असताना त्यांच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागने रंगेहाथ पकडल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मयताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळविण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करायचा होता. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीओआर फॉर्म देण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीनंतर १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले. ही रक्कम थेट न घेता, खाजगी इसम अभिजित प्रकाश शिर्के (रा. चिपळूण) याच्यामार्फत स्वीकारण्याचे निर्देश मनिष कांबळे यांनी तक्रारदाराला फोनद्वारे दिल्याचे तपासात उघड झाले.

त्यानुसार तक्रारदार चिपळूण पोलीस ठाण्याजवळील सोमेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानात गेला. तेथे अभिजित शिर्के यांनी मनिष कांबळे यांच्याशी फोनवर संवाद साधल्यानंतर पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लोकसेवकाच्या सांगण्यावरून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने शिर्के याला लाच रकमेनेसह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon