मरोळ रमाबाई नगर परिसरात गॅस लीकमुळे लागलेल्या आगीत तीन जण गंभीर जखमी

Spread the love

मरोळ रमाबाई नगर परिसरात गॅस लीकमुळे लागलेल्या आगीत तीन जण गंभीर जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मरोळ रमाबाई नगर परिसरात रविवारी पहाटे गॅस लीकमुळे झालेल्या आगीत तीन जण गंभीर जखमी झाल्याची गंभीर घटना घडलीय. रमाबाई नगर येथील झोपडपट्टी परिसरातील एका घरात पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घरातील सदस्य झोपेत असताना संपूर्ण घरात गॅस पसरला होता. पहाटे उठल्यानंतर लाईट चालू करतात स्फोट झाला.यात तिघे गंभीर जखमी झाल्या असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घरात एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती होत होती. घरातील सदस्य झोपेत असताना गॅस संपूर्ण घरात पसरला होता. पहाटे उठल्यानंतर घरातील लाईट सुरू करताच ठिणगी पडली आणि क्षणार्धात भीषण आग लागली. आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की घरातील तीन जण होरपळले. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या घटनेमुळे रमाबाई नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या वेळेत नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी या घटनेचे थरारक दृश्य पाहिले. प्रत्यक्षदर्शी रोहन सावंत यांनी सांगितले की, “ सकाळी सात वाजेच्या सुमारास रमाबाई आंबेडकर नगर विजय नगर येथे मोठा स्फोट झाल्याचे कळाले. त्यानंतर लगेच अग्निशामन दलाला बोलवण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर गॅस गळतीमुळेच स्फोट झाल्याचे कळाले.यस स्फोटात तिघांना भाजले असून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांपैकी एकाची परिस्थिती गंभीर आहे.

दरम्यान, गॅस लीक नेमकं कशामुळे झालं, सिलेंडरमध्ये तांत्रिक बिघाड होता की रेग्युलेटर अथवा पाईपमधून गळती झाली, याबाबत अधिक तपास सुरू आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि एमआयडीसी पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी घरगुती गॅस सिलेंडर वापरताना अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गॅस गळतीचा संशय आल्यास लाईट किंवा कोणताही विद्युत स्विच न लावता तात्काळ वेंटिलेशन करून संबंधित यंत्रणांना कळवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon