महाविकास आघाडीत फुट; काँग्रेसची मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा

Spread the love

महाविकास आघाडीत फुट; काँग्रेसची मुंबई महानगर पालिकेची निवडणूक
स्वबळावर लढण्याची घोषणा

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. २९ महानगर पालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर असणार आहे. शिवसेना ठाकरे गट या महापालिकेत सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप मुंबईत सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहे. महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास झालेला आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, ‘आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू. आम्ही याबाबतचा जाहीरनामा तुमच्यासमोर सादर करू. त्यामुळे मतदारांना मी आवाहन करतो की, आम्हाला साथ द्या आम्ही मुंबईचा विकास करू.

राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन मुंबई पालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली होती. या घोषणेनुसार उमेदवारांना २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या काळात अर् दाखल करता येणार आहेत. निवडणूक आयोग ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी करेल. २ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान १५ जानेवारीला तारखेला होणार आहे. तर मतमोजणी १६ जानेवारी २०२६ या तारखेला केली जाईल आणि निकालही याच दिवशी घोषित केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon