एमडी तस्करीप्रकरणी दोन आरोपींना २० वर्षांची शिक्षा; ३४ कोटींच्या अंमली पदार्थ जप्तीचा खटला निर्णायक टप्प्यावर
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : अंमली पदार्थ तस्करीविरोधात मुंबई पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलांना मोठे यश मिळाले आहे. एमडी (मॅफेड्रोन) या अमली पदार्थाच्या निर्मिती व विक्रीप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या दोन आरोपींना मुंबईतील ४४ व्या विशेष सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सक्तमजुरी कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रविण दिलीप वाघेला आणि रामदास पांडुरंग नायक यांचा समावेश आहे. हा गुन्हा २०१७ साली अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या बांदा (घाटकोपर) युनिटने उघडकीस आणला होता.
९ जानेवारी २०१७ रोजी घाटकोपर युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चेंबूर येथील छेडा नगर बेस्ट बसस्टॉप परिसरात सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान प्रविण वाघेला याच्या ताब्यातून तब्बल १० किलो २०० ग्रॅम एमडी (अंदाजे किंमत २ कोटी ४ लाख रुपये) तसेच होंडा सिव्हिक कार जप्त करण्यात आली. पुढील तपासात कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील केमिकल प्लॉटवर छापा टाकून रामदास नायक याच्या मदतीने सुरू असलेली एमडी निर्मिती उघडकीस आली. तेथून ७ किलो एमडीसह मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्ये, उपकरणे आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
या प्रकरणात फिरदोस रज्जाक नाथानी उर्फ फिरोज यालाही एमडी विक्रीस मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र वेळेत न्यायालयात सादर करण्यात आले. खटल्यादरम्यान पोलिसांनी सादर केलेले सर्व साक्षी व पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने प्रविण वाघेला आणि रामदास नायक यांना दोषी ठरवले.
ही संपूर्ण कारवाई तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भालेकर, पोलीस उपनिरीक्षक चारू चव्हाण, तसेच द्वितीय तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सरकारी वकील भगवान राजपूत यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
अंमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीसाठी मुंबई पोलीस सातत्याने कठोर कारवाई करत असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.