नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा ४५८ वर

Spread the love

नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा ४५८ वर

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – नवी मुंबईतील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खारघर आणि कोपरखैरणे या दोन वेगवेगळ्या भागांतून पुन्हा दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.गेल्या दहा दिवसांपासून या गंभीर विषयावर सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. शहरात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण ज्या वेगाने वाढत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे.

नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरातून आतापर्यंत तब्बल ४५८ मुले व मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मुले बेपत्ता होणे ही केवळ स्थानिक पोलिसांचीच नव्हे, तर राज्य सरकारचीही चिंता वाढवणारी बाब ठरली आहे.

या वाढत्या घटनांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी नवी मुंबईतील बेपत्ता मुलींच्या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली असून, यामागे काही मोठे रॅकेट किंवा मानवी तस्करी तर नाही ना, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्द्यांची दखल घेऊन योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्याचा आश्वासन दिलं होतं.

नवी मुंबईत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत, अशी विनंतीही पालकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon