नवापूर ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक

Spread the love

नवापूर ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेश पंढरीनाथ संखे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ना-हरकत दाखला देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केल्याची तक्रार होती. मंगळवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायत हद्दीतील तक्रारदाराच्या मालकीच्या शेतीमध्ये कृषी पर्यटनासाठी तरंग तलाव, तीन रुम, उपहार सुरु करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयलयात अर्ज केला होता. ना हरकत दाखला देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी राजेश संखे यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाच्या पालघर युनिटकडे केली होती.

तक्रारीनुसार मंगळवारी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी राजेश संखे यांनी तक्रारदारांकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. यावेळी राजेश पंढरीनाथ संखे याला तक्रारदाराकडून पंचासमक्ष २० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राकेश डांगे,पोलीस अंमलदार विलास भोये, आकाश लोहारे, जितेंद्र गवळे यांच्या पथकाकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon