कामोठे येथे महिलांसाठी मोफत फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा
रवि निषाद / वार्ताहर
नवी मुंबई – दिशा महिला मंचच्या वतीने कामोठे येथील आई माताजी मंदिर, सेक्टर ३६ येथे महिलांसाठी मोफत फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत परिसरातील ३२ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेत प्रसिद्ध प्रशिक्षिका भावना सरदेसाई यांनी महिलांना फॅब्रिक पेंटिंगची प्राथमिक ते प्रगत तंत्रे अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितली. रंगांची योग्य निवड, डिझाइनची मांडणी, ब्रशचा वापर तसेच फॅब्रिकवर टिकाऊ पेंटिंग कसे करावे, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कृतीतून कला शिकण्याची संधी मिळाल्याने महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
कार्यक्रमाला दिशा महिला मंचच्या संस्थापक नीलम आंधळे, उपाध्यक्ष विद्या मोहिते तसेच जयदादा डिगोळे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महिलांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सृजनशीलतेला चालना मिळते, तसेच घरबसल्या रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे, या उद्देशाने दिशा महिला मंच सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती मंचच्या अध्यक्षा नीलम आंधळे यांनी दिली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी महिलांनी दिशा महिला मंच तसेच प्रशिक्षिका भावना सरदेसाई यांचे आभार मानले. भविष्यातही अशा उपयुक्त आणि प्रेरणादायी कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.