परराज्यातून हत्यार तस्करी करणारा तरुण नौपाडा पोलिसांच्या जाळ्यात; देशी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
योगेश पांडे/ वार्ताहर
ठाणे : परराज्यातून अग्निशस्त्र आणून ठाणे शहरात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणास नौपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई १३ डिसेंबर रोजी करण्यात आली.
नौपाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, भोपाळ (मध्यप्रदेश) येथून एक इसम अग्निशस्त्र घेऊन ठाण्यातील नौपाडा येथील सर्व्हिस रोड परिसरात विक्रीसाठी येणार आहे. या माहितीनुसार पोलिसांनी नौपाडा सर्व्हिस रोडवरील ओपन जिम परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयास्पद हालचाली करणारा एक तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच तो पळून जाऊ लागला. मात्र, पाठलाग करून ओम शांकुतल सोसायटीसमोर, सर्व्हिस रोड येथे त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव कुणाल गोपाल यादव (वय १९, रा. दुलादेव, ता. अमरवाडा, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असल्याचे सांगितले.
त्याच्या बॅगची झडती घेतली असता सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सिल्वर बॉडी असलेले देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पुढील तपासात आरोपीने हे हत्यार भोपाळ येथून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४२/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई उपायुक्त पोलीस सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.