नाशिकमध्ये तरुणाच्या गूढ मृत्यूचा महिन्याभरानंतर उलगडा; पोलिसांनी बिहार आणि यूपी राज्यात तपास पथक पाठवत आरोपींना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गोवर्धन येथील फाशीच्या डोंगर परिसरात २९ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या गूढ खुनाचा अखेर एक महिन्यानंतर उलगडा करण्यात आला आहे. या प्रकरणात परप्रांतीय कामगार अरविंद पांडे (४०) याचा मृतदेह आढळला होता. मृतदेह निर्जन ठिकाणी असल्यामुळे आणि चेहऱ्यावर सुकलेल्या रक्तामुळे त्याची ओळख लगेच होणे कठीण होते, मात्र पोलिसांच्या मेहनतीने मृतदेहाची ओळख पटवली गेली आणि गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासात उघड झाले आहे की, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अरविंद पांडे दारु पित असताना स्थानिक निवासी मंजय पंडित आणि धर्मेद्र पंडीत यांच्यासोबत तो दारु पिऊन मोटारसायकलवर निघाला होता. या यानंतर दोघांनी धारदार शस्त्र आणि दगडाने मारहाण करून अरविंदची हत्या केली होती. हत्या झाल्यानंतर मृतदेह फाशीच्या डोंगर परिसरात सोडण्यात आला. निर्जनस्थळी मृतदेह असल्यामुळे खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज, एमआयडीसीमधील कामगारांकडून चौकशी, मानवी कौशल्य वापरले. तपास पथकामार्फत परिसरातील दारु दुकानांचं सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले. यावेळी अरविंदला मंजय पंडित आणि धर्मेद्र पंडीत हे दारु पिल्यानंतर मोटार सायकलवर घेऊन गेल्याचे दिसून आले होते.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी बिहार राज्यात तपास पथक पाठवून मंजय केशव पंडीत याला त्याच्या घरून ताब्यात घेतले, ज्या ठिकाणी गुन्ह्यात वापरलेले चाकू, रक्ताचे कपडे आणि मोटारसायकल आढळली. कोर्टाने मंजयला ७ दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यानंतर या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला. मुख्य आरोपी धर्मेद्र शिवनारायण प्रजापती हा वृंदावन, उत्तर प्रदेशमध्ये लपून बसला होता, ज्याला तपास पथकाने शोधून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरम्यान, गुन्हा किरकोळ वादातून दारू पार्टीदरम्यान झाला होता. मृतदेहाचे चेहरा ओळखणे कठीण झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही, चौकशी आणि मानवी कौशल्य वापरून खुनाचा उलगडा केला. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.