एसीबीचं धाडसत्र जोरात! ३५ हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ बेड्या

Spread the love

एसीबीचं धाडसत्र जोरात! ३५ हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला सापळा रचून रंगेहाथ बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

पालघर – राज्यात एसीबी पथकाडून धडक मोहिम सुरू असून आजच मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्यास अटक केली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा पोलीस प्रशासनातही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून पालघर जिल्ह्यातही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक केली. पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून, ३५ हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली.

एबीसी पथकाने मुंबईतील मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात अटक केलेल्या कारवाईची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर, अनेक ठिकाणी एसीबीने छापे टाकत लाचखोर अधिकारी, व कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यातच, आता पालघर जिल्ह्यातही वैद्यकीय विभागात अशीच कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील गंजाड अंतर्गत उपकेंद्र आंबेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे (३४) यांस ३५,००० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तक्रारदार (४०) यांचे इको वाहनाचे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी डॉक्टरांनी वारंवार पैशांची मागणी केली होती. अखेर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईत आरोपी डॉ. सांगळे यांना तक्रारदाराकडून ३५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon