कुर्ल्यात ऑटोवरून वाद; युवकाची हत्या, विधीसंघर्षित बालक ताब्यात
रवि निषाद / मुंबई
मुंबई : कुर्ला (पूर्व) येथील नेहरू नगर परिसरातील रेल्वे क्वार्टरमध्ये ऑटोमध्ये बसण्याच्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम नायडू असे मृत युवकाचे नाव आहे. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास न्यू रेल्वे कॉलनी, साबळे नगर, कुर्ला (पूर्व) येथील इमारत क्रमांक १०५ समोर ही घटना घडली.
ऑटो रिक्षामध्ये बसण्यावरून मृत युवक आणि विधीसंघर्षित बालक यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच संतापाच्या भरात बालकाने धारदार शस्त्राने जयराम नायडू यांच्या मानेच्या डाव्या बाजूस वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नायडू यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, नेहरू नगर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत संबंधित विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अशी माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.