पोस्को प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन; पनवेल विशेष सत्र न्यायालयाचा निर्णय
रवि निषाद / मुंबई
मुंबई – पोस्को कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील एका मुख्य आरोपीला पनवेल येथील विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने उच्च न्यायालयातील ॲड. राज कांबळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, तसेच उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला.
आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. कांबळे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले की, संबंधित प्रकरणात आरोपीला खोट्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. हा आरोपी ग्रामीण भागातील एक शेतकरी तरुण असून, या प्रकरणातील सहआरोपी व फिर्यादी यांच्यातील वैयक्तिक वादातून त्याला विनाकारण अडकविण्यात आले असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथमदर्शनी ठोस पुरावे नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. याबाबत बोलताना ॲड. राज लहु कांबळे यांनी सांगितले की, समाजात लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोस्को सारखा कठोर कायदा अस्तित्वात आहे. मात्र काही ठिकाणी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे प्रकारही समोर येत असून, अशा गैरवापरालाही आळा घालण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.