रिक्षा चालकाच्या कृत्यामुळे शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
५४ वर्षीय रिक्षाचालकाकडून चालत्या रिक्षात महाविद्यालयीन मुलीची छेड; मालाड पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मालाड येथे सोमवारी अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. एका ५४ वर्षीय रिक्षाचालकाने चालत्या रिक्षात महाविद्यालयीन मुलीची छेड काढली. तसेच तिने आरडाओरडा करताच भरधाव रिक्षातून तिला खाली ढकलून दिले. मुलगी कशीबशी घरी पोहोचली आणि घाबरलेल्या मुलीकडून माहिती मिळताच पालकांनी थेट मालाड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या.
सोमवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास विद्यार्थिनी महाविद्यालयातून बाहेर पडली आणि एस.व्ही. रोड, मालाड पश्चिम येथे ऑटोची वाट पाहत होती. त्याचवेळी केशव प्रसाद यादव नावाच्या ऑटोचालकाने आपली रिक्षा तिच्यासमोर थांबवली. विद्यार्थिनीने सुराणा रुग्णालयाजवळ जाण्यासाठी ऑटो घेतला. सुरुवातीला ती प्रवासी सीटच्या उजव्या बाजूला बसली होती. मात्र रस्त्यावरील दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत यादवने तिला मध्यभागी बसण्यास सांगितले.
ऑटो सुटताच केशव यादव याने आरशातून तिच्याकडे पाहणे, डोळा मारणे आणि अश्लील हावभाव करणे सुरू केले. परिस्थिती धोकादायक होत असल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनीने मदतीसाठी आरडाओरड केली. यावर आरोपीने तिला धमकावून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. तरीही मुलगी पुन्हा ओरडताच, आरोपीने चालत्या ऑटोतून तिला जोरात ढकलून रस्त्यावर फेकले. त्यावेळी रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने गंभीर अपघाताची शक्यता होती.
घाबरलेली मुलगी कशीबशी घरी पोहोचली आणि आई-वडिलांना संपूर्ण घटना सांगितली. तिची आई आणि बहीण तिला घेऊन लगेच मालाड पोलिस ठाण्यात गेल्या. मुलीच्या तक्रारीवर त्याच दिवशी एफ.आय.आर. नोंदवण्यात आला. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील २५ ते ३० सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले. त्यातून ऑटोचा फोटो आणि त्याचा नोंदणी क्रमांक मिळाला. त्यानंतर उत्तर मुंबईत शोधमोहीम राबवण्यात आली.
डी.सी.पी. संदीप जाधव व वरिष्ठ निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथक रवाना झाले. निरीक्षक संजय बेडवाल आणि उपनिरीक्षक तुषार सुखदेव यांना काही तासांतच कांदिवली पश्चिमेतील मथुरदास रोडवर रिक्षा आढळली. त्या ठिकाणी पोहोचता यादव ऑटोमध्येच झोपलेला आढळला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी सांगितले की, यादव हा कांदिवली पश्चिमेतील लालजीपाडा परिसरात राहतो. त्याच्यावर पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.