मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह?

Spread the love

मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह?

सिद्धेश्वरच्या एसी फर्स्ट क्लासमधून कल्याणदरम्यान पाच कोटींचं सोनं गायब; रेल्वे पोलीसांकडून तपास सुरु

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – लोकल ट्रेनमध्ये किंवा मेल एक्सप्रेसमध्ये चोऱ्या झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. पण नुकतीच मेल एक्सप्रेसमधील चोरीची अशी घटना समोर आली आहे, ज्यासाठी पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आली आहे. सोलापूर – मुंबई मार्गावरील सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये या कोट्यवधींच्या चोरीची घटना घडली आहे.

सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या एसी ए- 1 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या लॉक केलेल्या ट्रॉली बॅगमधून जवळपास ५ किलो वजनाचं सोनं चोरी झालं. या सोन्याची रक्कम अंदाजे ५.५ कोटी रुपये आहे. ६ डिसेंबर च्या मध्यरात्री ही चोरी झाली.

मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी असलेले अभय कुमार जैन हे त्यांच्या मुलीसोबत एसी फर्स्ट क्लास कोच ए-१ मधून प्रवास करत होते. ४९ आणि ५१ असे त्यांचे बर्थ क्रमांक होते. प्रवास करताना जैन यांच्याकडे दोन ट्रॉली बॅग होत्या. त्यापैकी एका ट्रॉली बॅगमध्ये ५ किलोचे सोन्याचे दागिने होते. रात्री प्रवास करताना झोपण्याआधी त्यांनी ट्रॉली बॅग लॉक करून त्यांच्या बर्थखाली ठेवली.७ डिसेंबर रोजी सकाळी ट्रेन कल्याण स्टेशनजवळ आली तेव्हा जैन यांना जाग आली, पण त्यांना सोने असलेली ट्रॉली बॅग गायब असल्याचं समजलं. त्यांनी लगेच टीटीई विक्रम यांना याबाबत कळवलं आणि रेल्वे आपत्कालीन हेल्पलाइनशी संपर्क साधला. सोनं असलेली बॅग गायब झाल्याची घटना कल्याणजवळ उघडकीस आल्याने, जैन यांना कल्याण रेल्वे पोलिसांशी अर्थात जीआरपीशी संपर्क साधण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर कल्याणमध्येच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांत तक्रार दाखल करताना जैन यांनी दागिन्यांची सविस्तर यादी, संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. चोरीला गेलेली बॅग निळ्या आणि काळ्या रंगाची अमेरिकन टूरिस्टर ट्रॉली बॅग होती. त्यात सोन्याचे दागिने भरलेला एक पांढरा प्लास्टिक बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये नेकलेस, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातले, चेन, वाट्या आणि इतर दागिने होते. या दागिन्यांची किंमत ५.५ कोटी होती.

दागिन्यांची बॅग शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथक तयार करण्यात आली. लवकरच याबाबत ठोस पुरावे मिळतील अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून रेल्वे स्थानकं, कोचमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. ही चोरी सुनियोजित असून प्रवासाशी परिचित असलेल्या संघटित टोळीने ती घडवून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon