महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करून, महिलांशी ओळख निर्माण करुन अश्लील चॅट करणाऱ्यास अटक
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर : समाज माध्यमावर महिलेच्या नावाचे बनावट खाते तयार करून, विविध महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी ओळख निर्माण करून, अश्लील चॅट करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. जलील शहा खलील इनामदार असे अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेमुळे काही काळापूर्वी एंजेल प्रिया या नावाने फेक अकाऊण्ट सुरु करुन पुरुषांना गंडा घालणाऱ्या घोटाळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर आपल्या नावाचे बनावट अकाउंट फोटोसह तयार करण्यात आले आहे. त्या अकाउंटवरून काही महिलांशी अश्लील चॅटिंग केले जात आहे, अशी तक्रार एका महिलेने सायबर पोलिसांत १३ ऑक्टोबर रोजी दाखल केली होती. त्या आधारे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व पथकाने तपास करून संबंधित बनावट इन्स्टाग्राम खात्याची माहिती मिळवली आणि त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. तपासामध्ये महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करणाऱ्या व्यक्तीचे नाव जलील शहा असल्याची माहिती समोर आली.
जलील शहा याला गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, सहायक फौजदार कैलास कामठे, दत्ता तरटे, सविता जायभाये, मुकेश वाघ, योगेश तरमाळे, राजेश राठोड, यांनी जलील शहा याला ताब्यात घेतले.पोलिसांनी जलील शहा याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपण सोशल मीडियावर महिलेच्या नावाने खाते तयार करण्यासाठी बहिणीच्या मोबाइलवर ओटीपी मागवला, अशी माहिती दिली. समाज माध्यमात खाते तयार करण्यासाठी त्याने डीपीवर एका महिलेच्या फोटो आणि नावाचा वापर केला.