मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत!

Spread the love

मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत!

शिवसेनेच्या ऐतिहासिक बंडावर उद्योगमंत्री उदय सामंत लिहिणार पुस्तक

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – एकनाथ शिंदे यांनी साडे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षात मोठी फूट पडली. शिंदे यांनी केलेलं बंड पक्षात आधी झालेल्या बंडांपेक्षा अनेकार्थांनी वेगळं होतं. आता याच बंडावर एक पुस्तक येणार आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुस्तक लिहिण्याचा मानस व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडावर ‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’ असं पुस्तक लिहिण्याचा आणि लेखक बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस उदय सामंत यांनी बोलून दाखवला. ठाण्यातील एका साहित्य विषयक कार्यक्रमात ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद आणि आनंद विश्वास गुरुकुल महाविद्यालय यांनी एका साहित्य विषयक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या विकास आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी उदय सामंत यांनी उपस्थितांना दिली. मंत्री सामंत यांनी लेखक व्हायची इच्छा व्यक्त केली. ‘मी मनाची तयारी केलेली आहे. ‘मुंबईत ते गुवाहाटी व्हाया सूरत’ हे पुस्तक मी लिहिणार आहे,’ असं सामंत यांनी सांगितलं. तेव्हा सभागृहात अनेकांच्या चेहऱ्यावर मंद स्मित हास्यासह काहीसे आश्चर्याचे भाव होते.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या सर्वात मोठ्या बंडावर आधारित पुस्तकाचं शीर्षक काय असेल यावर मंत्री सामंत यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. शिंदे यांनी जून २०२२ मध्ये नगरविकास मंत्री असताना शिवसेनेत बंड केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. राज्यातील गुप्तहेर यंत्रणेला चकवा देऊन शिंदे यांनी जवळपास ३० आमदारांसह सूरत गाठली. २० जूनच्या रात्री शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार मुंबईतून निघाले. सकाळी ते सूरतमध्ये पोहोचले. शिंदेंना पाठिंबा देणार्‍या आमदारांचा आकडा हळूहळू वाढत गेला.

शिंदे आणि त्यांचा गट २२ जूनच्या सकाळी गुवाहाटीत पोहोचला. तेव्हा आपल्या मागे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला. गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात त्यांचा मुक्काम होता. शिंदे यांचं बंड यशस्वी ठरत असल्याचं पाहून काही आमदार मंत्री नंतर त्यांच्या सोबत जोडले गेले. मंत्री उदय सामंत २६ जूनला गुवाहाटीला पोहोचले. चार्टर्ड विमानानं त्यांनी गुवाहाटी गाठली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon