कल्याण परिमंडळ ३, पोलिसांच्या तपासाला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनची जोड

Spread the love

कल्याण परिमंडळ ३, पोलिसांच्या तपासाला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनची जोड

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : गुन्ह्यांच्या तपासात अधिक गती, अचूकता आणि विश्वासार्हता येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परिमंडळ ३, कल्याण येथे अत्याधुनिक (फॉरेन्सिक व्हॅन) कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्र गृह विभागाच्या शासन निर्णय क्र. एफएसएल ०४२४/प्र.क्र. २०५/पोल-४ दिनांक २२ जुलै २०२५ अन्वये ही व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या फॉरेन्सिक व्हॅनचा लाभ महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडी, खडकपाडा, डोंबिवली, विष्णुनगर, मानपाडा आणि टिळकनगर अशा एकूण ८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी मिळणार आहे. गुन्हा घडताच तातडीने घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करण्यात येणार असून, सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर अशा तज्ज्ञांच्या पथकाकडून पुरावे गोळा केले जाणार आहेत.

या व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजिटल पुरावे संकलित करण्यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक किट्स, रसायने व उपकरणे उपलब्ध आहेत. घटनास्थळीच प्राथमिक तपासणी, चाचण्या व परीक्षण करून अहवाल लवकर प्राप्त होऊ शकणार आहे. यामुळे आरोपींच्या अटकेस वेग येणार असून, न्यायालयात ठोस व वैज्ञानिक पुरावे सादर करणे अधिक सोपे होणार आहे.

फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असून, तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे. ही फॉरेन्सिक व्हॅन दिवस-रात्र दोन स्वतंत्र पथकांसह २४ तास कार्यरत राहणार असून, तिचे नियंत्रण कक्ष कल्याण येथे कार्यरत असणार आहे.

या उपक्रमामुळे कल्याण परिमंडळातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यास तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेला नवी दिशा मिळणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon