शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये देणग्यांच्या निधी बनावट अ‍ॅप्स द्वारे थेट वैयक्तिक खात्यात; दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक

Spread the love

शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये देणग्यांच्या निधी बनावट अ‍ॅप्स द्वारे थेट वैयक्तिक खात्यात; दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

अहिल्यानगर – शनिशिंगणापूर देवस्थान अ‍ॅप घोटाळ्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या आणि विधिमंडळातही गाजलेल्या या प्रकरणात सायबर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री गुप्त कारवाई करत देवस्थानाचे कर्मचारी सचिन शेटे आणि संजय पवार यांना अटक केली आहे.शुक्रवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून तपासाचा वेग आणखी वाढला आहे.

तपासादरम्यान मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. देवस्थानकडे अधिकृत तीन मोबाईल अ‍ॅप्स उपलब्ध असताना अतिरिक्त चार बनावट अ‍ॅप्स तयार करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या अ‍ॅप्समधून भक्तांनी केलेल्या देणग्यांपैकी मोठा निधी थेट संशयितांच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आल्याचे दस्तऐवजी पुरावेही पोलिसांच्या हाती आले आहेत. प्राथमिक निष्कर्षानंतर हा गुन्हा शनिशिंगणापूर ठाण्यातून सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आला आणि तपास वेगाने पुढे सरकला.

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले तपासाचे सूत्र हाताळत आहेत. देवस्थानातील विश्वस्त, कर्मचारी वर्ग तसेच काही पुजारी यांची कसून चौकशी सुरू असून संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी चालू आहे. अ‍ॅपद्वारे आलेला पैसा नक्की कोणाकडे, किती आणि कोणत्या मार्गाने पोहोचला याचा मागोवा युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.

सायबर पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकून शेटे आणि पवार यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणाबाबत सोनई येथील काँग्रेसचे संभाजी माळवदे, तसेच भाजपचे ऋषिकेश शेटे आणि वैभव शेटे यांनी सुरुवातीपासून आवाज उठवला होता. त्यांच्या तक्रारींवरूनच सायबर शाखेने कारवाईला वेग दिला आणि कोट्यवधींच्या देणगी घोटाळ्याचा तपास सुरू झाला.सायबर पोलिसांनी उभारलेले तपासाचे जाळे आणखी रुंदावण्याची शक्यता आहे. शेटे आणि पवार यांच्या पुढील चौकशीत या घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon