२४ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; आरोपीला केली अटक, सोनसाखळी जप्त

Spread the love

२४ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; आरोपीला केली अटक, सोनसाखळी जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेली सुमारे १ लाख रुपये किमतीची सोनसाखळीही हस्तगत केली आहे.

दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १०.०५ ते १०.१५ या वेळेत न्यू मिल रोडवरील ‘दिल बहार स्टोअर्स’ या दुकानात फिर्यादी श्रीमती संतोषी मोहन असरानी (वय ६२, रा. जनम हाईट, सुभाषनगर, कुर्ला) पाव खरेदी करत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे १०.६ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून भारतनाक्याच्या दिशेने पळ काढला होता. याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्र. ८१३/२०२५ कलम ३०९ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत तो कुर्ला रेल्वे स्थानकातून हार्बर मार्गाने प्रवास करून वडाळा स्थानकापर्यंत गेल्याचे निष्पन्न केले. पुढील तपासात संशयित हा शाहुनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपी अमान जफर शेख (वय २२, रा. माटुंगा लेबर कॅम्प, धारावी) असल्याचे स्पष्ट झाले.

खबऱ्याच्या माहितीनुसार, आरोपी संजय गांधी नगर, माटुंगा येथील रेल्वे पटरी परिसरात आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली अंदाजे १ लाख रुपये किमतीची, ६० सें.मी. लांबीची तुटलेली सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ५), सहाय्यक पोलीस आयुक्त (कुर्ला विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चोरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आरती खेतमाळीस, सहायक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह कुर्ला व शाहुनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरोधात कुर्ला पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon