पुरुषावर अत्याचार करणाऱ्या वादग्रस्त महिलेचा आणखी एक कारनामा, पुण्यात दुसरा गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात पुरुषावर अत्याचार केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या गौरी वांजळे हिच्यावर आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती-पत्नीच्या वादातील प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पुरुषाची पत्नीबरोबर कौटुंबिक न्यायालयात केस सुरू असून या प्रकरणात मदत करण्याचे सांगत आरोपी गौरी वांजळे हिने फिर्यादीशी ओळख वाढवली. स्वतःला हायकोर्टातील वकील असल्याचे भासवून तिने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने फिर्यादीला ब्लॅकमेल करत मोठ्या रकमेची खंडणी मागितली, अशी तक्रार मुंढवा पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
याआधीच्या प्रकरणात गंभीर आरोप
याआधी कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पीडित तरुणाने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी महिलेने स्वतःला वकील असल्याची बतावणी करून फिर्यादीला सतत धमकावत राहिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, गौरी वांजळे हिने फिर्यादीला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला, तसेच त्याचे अश्लील फोटो काढून त्याच्या आधारे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात होती.
आरोपीने पुण्यातील तिच्या राहत्या घरी तसेच कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी जाऊनही बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याचबरोबर तिने फिर्यादीला वाराणसी (काशी विश्वनाथ) येथे नेऊनही अत्याचार केल्याचे गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहेत.
या दोन्ही प्रकरणांमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून, आरोपी महिलेवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलीस दोन्ही गुन्ह्यांचा सखोल तपास करत असून लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.