डोंबिवलीतील महिलेची भिवंडीतील बांधकाम व्यावसायिकांकडून कोटी रुपयांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवलीतील बांधकाम क्षेत्राशी संबंधित एका महिला उद्योजिकेला भिवंडीतील दोन बांधकाम व्यावसायिकांनी तब्बल एक कोटी १९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी नांदकर येथे सुरू होत असलेल्या बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, तसेच त्यांच्या मुलाला कंपनीत संचालकपद देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी ही रक्कम घेतली. मात्र गुंतवणूक केल्यानंतर पैसे परत न करता संबंधितांनी महिलेची फसवणूक केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आशा दत्तात्रय घुले (रा. कस्तुरी प्लाझा, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, भिवंडीतील नारायण चांगो पाटील आणि हरीश गुणवंतराव गांधी या बांधकाम व्यावसायिकांवर कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०१२ ते २०१३ दरम्यान पाटील आणि गांधी यांनी आशा घुले यांच्या घरी जाऊन भिवंडी नांदकर येथे मोठा बांधकाम प्रकल्प सुरू असल्याचे सांगितले. “गुंतवणूक केल्यास मोठा लाभ मिळेल” असे सांगून त्यांनी मेसर्स श्री जी वृंद रिॲलिटीच्या माध्यमातून एक कोटी १५ लाख रुपये घेतले. तसेच, आशा यांचा मुलगा सिद्धांत घुले यांना कंपनीत संचालक करण्यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून चार लाख १५ हजार रुपये घेतले.
गुंतवणूक झाल्यानंतर आशा घुले व त्यांचा मुलगा सिद्धांत यांनी प्रकल्पाची कागदपत्रे तपासली असता भिवंडीतील संबंधित बांधकाम कोणत्याही शासकीय किंवा नियंत्रक यंत्रणेकडून परवानगी न घेता सुरू केल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी गुंतवणुकीची रक्कम परत मागितली, तसेच सिद्धांत घुले यांनी संचालकपदाचा राजीनामाही दिला.
वारंवार मागणी करूनही आरोपी व्यावसायिकांनी रक्कम न परतवल्याने अखेर आशा घुले यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपींनी घेतलेल्या रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरा करत असून आर्थिक गुन्हे शाखेनेही या फसवणूक प्रकरणाची दखल घेतली आहे.